महाराष्ट्र गीत

महाराष्ट्र गीत


बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। धृ ।।
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय – नदाविणे ।।
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा ।।
प्रिय अमुचा …. ।। १ ।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे ।
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा ।।
प्रिय अमुचा …. ।। २ ।।
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।।
प्रिय अमुचा …. ।। ३ ।।
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।
धर्म-राजकारण समवेत चालती ।
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा ।।
प्रिय अमुचा …. ।। ४ ।।
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो ।
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा …. ।। ५ ।।

कवी : श्री कृ. कोल्हटकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं

शिवरायांचे नाव घेता....

गलबला रं गलबला